आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेतर्फे देण्यात येणाऱ्या पुरस्कारांची घोषणा झाली आहे. भारताचा कर्णधार विराट कोहलीची सोमवारी आयसीसीचा दशकातील सर्वोत्तम पुरुष क्रिकेटपटू म्हणून निवड झाली. विराटला 2010-20 या दशकातील सर्वोत्तम खेळाडूला सर गारफिल्ड सोबर्स पुरस्काराने गौरवण्यात येतं आहे. या पुरस्कारासाठी भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीची निवड झाली.
कोहलीने या दशकात कसोटी, एकदिवसीय आणि ट्वेन्टी-20 प्रकारात मिळून 66 शतके झळकावली आहेत. या दशकभरात त्याने 94 अर्धशतकी खेळी देखील खेळल्या आहेत. या काळात कोहलीने सर्वाधिक 20396 धावा केल्या. या दशकात खेळणाऱ्या फलंदाजांमध्ये कोहलीची सरासरी सर्वोत्तम अर्थात 56.97 इतकी आहे. रविवारी आयसीसीने दशकातील सर्वोत्तम खेळाडूंचा संघ निवडला होता.
३२ वर्षीय विराटने आजपर्यंत एकदिवसीय क्रिकेटमध्ये १२०४० धावा, कसोटीत ७३१८ आणि टी-२० क्रिकेटमध्ये २९२८ धावा केल्या. क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांत ५० हून अधिकच्या सरासरीने धावा करणारा तो जागतिक क्रिकेटमधील एकमेव फलंदाज आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) सर्वोत्तम क्रिकेटपटूची ट्विटरच्या माध्यमातून घोषणा केली.