विधानपरिषदेत पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघात पाच जागांसाठी मतदान होत आहे. यामधील पुणे विभाग शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघासाठी मंगळवारी (दि,1) मतदान होत आहे. विभागीय आयुक्त कार्यालयाकडून मतदानाची पूर्ण तयारी झाली असून मतदान सुरू आहे. विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडी आणि भाजप पहिल्यांदा समोरासमोर लढत आहेत. आज सकाळी 8 वाजल्यापासून सायंकाळी 5 वाजेपर्यंत मतदानाची प्रक्रिया पार पडेल.
पदवीधर मतदानासाठी पुणे विभागामध्ये 4 लाख 32 हजार, तर शिक्षक मतदानासाठी 74 हजार 860 इतके मतदान आहे. पुणे विभागात एकूण 1 हजार 202 मतदान केंद्र आहेत. पदवीधर मतदारसंघासाठी 62 उमेदवार आहेत. यामध्ये महाविकास आघाडीचे अरुण लाड तर भाजप कडून संग्रामसिंह देशमुख निवडणूक लढवत आहेत. हे दोघेही नेते सांगली जिल्यातील असून हे मतदान अनोखे होणार आहे. तसेच शिक्षक मतदारसंघासाठी महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंत आसगावकर आणि भाजपचे जितेंद्र पवार हे निवडणूक लढवणार आहेत.
शिक्षक मतदारसंघासाठी गुलाबी तर पदवीधर मतदारसंघासाठी पांढऱ्या रंगाची पत्रिका आहे. यामध्ये उमेदवारांच्या नावापुढे कोणतेही चिन्ह नसून त्यासमोर 1 असा अंक लिहायचा आहे. निवडणूकिसाठी मतदान केंद्रावर मतदारांची ओळख पटण्यासाठी ओळ्खपत्र सादर करू शकत नाहीत त्यांच्यासाठी वाहनचालक परवाना, मतदारांचे आधारकार्ड, पॅन कार्ड तसेच पात्रपत्र याशिवाय 9 कागदपत्रे मतदानासाठी ग्राह्य धरण्यात येणार आहेत. दरम्यान, या मतदानाची मोजणी 3 डिसेंबरला होणार असून त्यादिवशी निकाल जाहीर होणार आहे.