महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह इतर काही मंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानांवर पुरवल्या गेलेल्या पाण्याची एकूण २४ लाख ५६ हजार ४६९ रुपयांची पाणीपट्टी महानगरपालिकेकडे जमा करण्यात आलेली नाही. त्यामुळे महानगरपालिकेने नियमांनुसार या सर्व बंगल्यांची नावे डीफॉल्टर म्हणजेच चुकवेगिरी करणाऱ्यांच्या यादीत टाकली आहेत.
माहितीच्या अधिकारातून समोर आलेल्या माहितीनुसार राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा शासकीय निवासस्थान असलेला वर्षा बंगला, मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षाकर्मचाऱ्यांसाठी असलेला तोरणा हा बंगला, अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा देवगिरी बंगला, जयंत पाटील यांचा सेवासदन हा बंगला, ऊर्जामंत्री नितीन राऊत यांचा पर्णकुटी हा बंगला, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचा रॉयलस्टोन, नवाब मलिक यांचा मुक्तागिरी, छगन भुजबळ यांचा रामटेक, रामराजे निंबाळकर यांचा अजंता सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांचा मेघदूत, उद्योगमंत्री सुभाष देसाई यांचा पुरातन, दिलीप वळसे-पाटील यांचा शिवगिरी, एकनाथ शिंदे यांचा नंदनवन, राजेश टोपे यांचा जेतवन, विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांचा चित्रकूट, राजेश हिंगणे यांचा सातपुडा हे सर्व बंगले पाणीपट्टी न भरल्यामुळे मुंबई महानगरपालिकेने डीफॉल्टर्सच्या यादीत टाकले आहेत. इतकेच नाही, तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा सागर बंगलाही या यादीत आहे.
बंगल्यांची दुरुस्ती करण्यात पैशांची उधळपट्टी करणाऱ्या सरकारने ही थकित पाणीपट्टी तात्काळ भरावी अशी मागणी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली आहे.टीव्ही 9 मराठीने दिलेल्या बातमीनुसार माहिती अधिकार कार्यकर्ते अहमद शेख यांच्या माहिती अधिकाराखालील अर्जावर उत्तर देताना ही माहिती देण्यात आलेली आहे.