आजच्या निवडणूक निकालानंतर विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या तिन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एकदिलाने काम केले. मागील अनेक वर्षे भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला म्हणून ओळखले जाणारे नागपूर आणि पुणे पदवीधर महाविकास आघाडीने जिंकले. महाविकास आघाडीच्या उमेदवारांना निवडणुकीत अभूतपूर्व यश मिळालं आहे. जनमताचा हा कौल आम्ही नम्रपणे स्वीकारत असल्याचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी स्पष्ट केले आहे.
महाराष्ट्रात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस एकत्र आल्यावर काय होते. हेही या निकालाने दाखवून दिले आहे. असा टोलाही जयंत पाटील यांनी भाजपला लगावला आहे. महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षातील आणि मित्र पक्षातील सर्व कार्यकर्त्यांचे, पदाधिकाऱ्यांचे जयंत पाटील यांनी अभिनंदन करतानाच महाराष्ट्रातील जनतेचे आभार मानले आहेत.
या राज्यातील, शेतकरी, कष्टकरी, कामगार आणि मध्यमवर्गीय आणि त्यांच्या सोबतच उच्चशिक्षित मतदार देखील महाविकास आघाडी सोबत ठामपणे उभा आहे हेच या निकालाने सिद्ध होते. असा विश्वास ही त्यांनी व्यक्त केला आहे. तसेच हा विजय महाविकास आघाडीसाठी कष्ट घेणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांना आणि मतदारांना जयंत पाटील यांनी समर्पित केला आहे.