आम्हीही कमी नाहीत, राष्ट्रवादीनंतर महामानवाच्या जयंतीनिमित्त काँग्रेसचेही राज्यव्यापी रक्तदान शिबिर

19

राज्यातील रक्ताचा अपुरा साठा लक्षात घेऊन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंती तसेच महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून राज्यभर रक्तदान शिबीरे आयोजित करण्यात येत आहेत.

जिल्हा मुख्यालयी व तालुका मुख्यालयाच्या ठिकाणी सकाळी ९ ते १२ या वेळेत हे रक्तदान शिबिर होणार असून आघाडी संघटना, विभाग व सेलच्या पदाधिकाऱ्यांचा यामध्ये सक्रीय सहभाग राहणार आहे.

घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना १३० व्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी प्रदेश काँग्रेसने १४ तारखेला व्हर्च्युअल कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे. कोरोनाची परिस्थिती लक्षात घेऊन केंद्र व राज्य शासनाने घालुन दिलेल्या निर्देशामुळे जाहीर राजकीय कार्यक्रमावर बंदी असल्यामुळे हा व्हर्च्युअल कार्यक्रम आयोजीत करण्यात आला आहे.

प्रांताध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली होत असलेल्या या व्हर्च्युअल कार्यक्रमात राज्यसभेतील विरोधी पक्षनेते खा. मल्लिकार्जुन खरगे, राज्याचे प्रभारी एच. के. पाटील, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस मुकुल वासनिक प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. राज्यातील काँग्रेसचे मंत्री व अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव, राज्याचे सहप्रभारी आदी या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.