बी. जी. कोळसे-पाटील यांनी ‘टीव्ही9 मराठी’शी बोलताना प्रतिक्रिया व्यक्त केली.सर्वोच्च न्यायालयानेही परवानगी नाकारली तरीही आम्ही परिषद घेणारच. जेल, कोर्ट आणि मरण याला आम्ही घाबरत नाही. आमचं काम आम्ही करतच राहणार,असा इशारा एल्गार परिषदेचे आयोजक आणि माजी न्यायाधीश बी. जी. कोळसे-पाटील यांनी दिला आहे.
पुण्यात एल्गार परिषदेचं आयोजन करण्याच्या हालचाली पुन्हा एकदा सुरू झाल्या आहेत.एल्गार परिषद ही सांस्कृतिक संघटना आहे. आम्ही सांस्कृतिक कार्यक्रम घोत असतो. त्यातून समाज प्रबोधन करण्याचा आमचा हेतू असतो. तरुणांना आम्ही मूळ प्रश्नांवर राजकारण करायला सांगतो. पोटापाण्याच्या प्रश्नावर राजकारण करायला सांगतो, असं कोळसे-पाटील म्हणाले.
आमच्यावर नक्षली संबंधाचे होणारे आरोप खोटे आहेत. आम्ही ब्राह्मणवादावर घाला घालतो. त्यामुळेच आम्हाला बदनाम केलं जात आहे, असं सांगतानाच दडपण आणून आम्हाला गुन्हेगार ठरवले जात आहे, असा आरोपही त्यांनी केला.डाव्या आणि उजव्या विचारांचा हा संघर्ष इतक्या शिगेला पोहोचलाय की आत्तापर्यंत या प्रकरणात देशातील विविध न्यायालयात 118 याचिका दाखल आहेत. तरीही यंदा एल्गारची सांस्कृतिक परिषद होणारच असल्याचं माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील यांनी सांगितलं आहे.