‘नुसतं एका ठिकाणी जाऊन चालत नाही, हिंदू धर्मात चारधाम आहेत’; ‘या’ नेत्याचा राज ठाकरे, देवेंद्र फडणवीसांना टोला

53

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे  अयोध्या येथे दौरा करणार आहेत. 1 मार्च ते 9 मार्चदरम्यान राज ठाकरे अयोध्येला जाणार असल्याची माहिती मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी दिली. राज ठाकरे यांच्या दौऱ्याबाबत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना विचारलं असता, ते म्हणाले, मी सुद्धा अयोध्या दौऱ्यावर जाणार आहे. त्यामुळे आता हे दोन्ही नेते अयोध्येला जाणार असल्याचं समजतंय.

राज ठाकरेंच्या दौऱ्याची घोषणा झाल्यानंतर भाजप नेते व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील अयोध्येला जाणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. यामुळे आता अयोध्या दौऱ्यावरून राज्यातील राजकारण रंगताना दिसत आहे.

राज्याचे अल्पसंख्याक मंत्री व राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी दोघांच्या दौऱ्यावर टीकास्त्र सोडलं आहे.
‘नुसतं एका ठिकाणी जाऊन चालत नाही, हिंदू धर्मात चारधाम आहेत. त्यामुळे लोकांनी केवळ अयोध्येत जाण्याऐवजी बद्रीनाथ किंवा पशुपतीनाथ येथेही जावे’ असा अप्रत्यक्षपणे टोला अयोध्येला जाणाऱ्या नेत्यांच्या दौऱ्यावर लगावला आहे.

तर, ‘उद्धव ठाकरे, राज ठाकरे किंवा अन्य कुठलेही नेते असोत प्रत्येकाची आस्था असते. या देशात प्रत्येकाला धर्मस्वातंत्र्य आहे. हा प्रत्येक नागरिकाचा मौलिक अधिकार आहे. त्यामुळे ते त्यांना हवं त्याठिकाणी जाऊ शकतात’ असं देखील ते म्हणाले आहेत.