महाविकास आघाडीने नुकत्याच पार पडलेल्या पदवीधर, शिक्षक निवडणुकीत मोठ यश मिळवलं होतं. पण त्यामधे शिवसेनेच्या वाट्याला आलेल्या एकमेव अमरावती शिक्षक मतदारसंघात पराभव झाला होता. त्यामुळे शिवसेनेची महाविकास आघाडीत वाताहत होणार असं बोललं जाऊ लागलं. त्याला आता राष्ट्रवादीकडून उत्तर दिलं गेलं आहे.
शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीमध्ये जरी कमी जास्त झालं असले तरी भविष्यकाळात त्याची भरपाई करणार आहे, असं सूतोवाच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केलं आहे. त्यांनी साताऱ्यात समाज माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते.
शिवसेनेला शिक्षक आणि पदवीधर निवडणुकीत मिळालेल्या अपयशाबाबत जयंत पाटलांना विचारले असता ते म्हणाले, विधानसभेची ही निवडणूक एकत्र लढून महाविकास आघाडीने उमेदवार उभे केले होते. त्यामध्ये काही ठिकाणी यश मिळाले. तर काही ठिकाणी अपयश मिळाले. कुणाला काय मिळाले ही परिस्थिती त्या ठिकाणच्या स्थानिक पातळीवर अवलंबून असते, असे सांगून शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जरी कमी जास्त झालं असले तरी भविष्यकाळात त्याची भरपाई होणार असल्याचे जयंत पाटील म्हणाले.