आम्ही वीजबिल भरणार नाही, सक्तीची वसुली करून तर बघा जशास तसे उत्तर देऊ : राजू शेट्टी

3

लॉक डाऊन मध्ये सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडले असताना आता ठाकरे सरकारने वाढलेल्या वीजबिलात कोणतीही सवलत देण्यास नकार दिला आहे. वीज ग्राहकांना सवलत मिळणार नसल्याची माहिती ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी दिली आहे. दोन दिवसांपूर्वी महावितरणने वीज बिल वसुलीबाबत आदेश काढले आहेत,
राज्यातील वीज ग्राहकांना वाढकेल्या वीज बिलातून सुटकारा मिळणार नाही, मीटर रिडींगप्रमाणे बिलं ग्राहकांनी भरलीच पाहिजेत असं राऊत यांनी स्पष्ट केलं आहे. ६९ टक्के वीज बिल वसुली पूर्ण झाली आहे, महावितरण ६९ हजार कोटीने तोट्यात आहे, आम्ही आता कर्ज काढू शकत नाही. महावितरणला आता वीज बिल वसुलीचे आदेश देण्यात आले आहेत.

सरकारच्या या निर्णयावरून चांगलच राजकारण तापायला लागलं आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने यावर आक्रमक भूमिका घेतली आहे. ऊर्जामंत्री नितीन राऊत वारंवार सांगत होते, आम्ही काही ना काही मदत करू, दिवाळीला गोड बातमी देऊ, सक्तीची वसुली करा ही गोड बातमी? त्यांचं नेमकं काय झालं ? असा प्रश्न शेतकरी संघटनेने विचारला आहे. सरकारवरचा आणि मंत्र्यावरचा सामान्य जनतेचा विश्वास उडेल, आम्ही वीजबिल भरणार नाही, सक्तीची वसुली करून बघा, जशास तसं उत्तर देऊ, रस्त्यावर उतरू असा इशारा राजू शेट्टी यांनी दिला आहे.