उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे मंगळवारी रात्री दोन दिवसीय मुंबईच्या दौऱ्यावर आले. मुंबईत आल्यानंतर त्यांनी सर्वप्रथम बॉलिवूडचा अभिनेता अक्षय कुमार याची भेट घेतली. त्यानंतर आज योगी आदित्यनाथ यांनी मुंबई शेअर बाजाराला भेट दिली. ते मुंबईत लखनऊ म्युनिसिपल कॉर्पोरेशनच्या बॉन्ड लिस्टिंग कार्यक्रमात सहभागी झाले होते. जाणून घेऊया काय आहे हा बॉन्ड आणि कसे जमवले जातात पैसे.
मुंबई शेअर बाजारात बुधवारी लखनऊ म्युनिसिपल कॉर्पोरेशनच्या बॉन्डचं लिस्टिंग करण्यात आलं. या बॉन्डच्या मदतीनं जमवण्यात येणाऱ्या पैशांमधून लखनौमध्ये पायाभूत सुविधांची कामं केली जाणार आहेत. लखनऊ म्युनिसिपल कॉर्पोरेशनच्या बॉन्डवर ८.५ टक्क्य़ांचं वार्षिक व्याज मिळणार आहे आणि मॅच्युअर होण्याचा कालावधी १० वर्षांचा आहे. याच्या लाँचनंतर लखनौ महापालिकेची प्रतीमाही सुधारणार असून त्यांना देश-परदेशातून पैसे जमवण्यासही मदत मिळणार आहे. बॉन्ड लाँच करण्यापूर्वीच वित्तीय संस्थांनी याला चांगलं रेटिंगही दिलं आहे. वाढत्या शहरीकरणाकडे पाहता शहरांना पुढील काही वर्षांमध्ये पायाभूत सुविधांच्या विकासासाछी मोठ्या प्रमाणात रक्कम लागणार आहे, म्युनिसिपल बॉन्डद्वारे कमी व्याजदरात कर्ज मिळवणं शक्य असल्याचंही म्हटलं जातं.
शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांमार्फत नगरपालिका किंवा नगरपालिकांद्वारे बॉन्ड जारी केले जातात. शहरात विकासकामे सुरू ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणात पैशांची गरज असते. त्यामुळे सरकारकडून पैसे घेण्याऐवजी हा एक चांगला पर्यायी स्रोत असल्याचे सिद्ध होत आहे. अशा प्रकारे बॉन्ड जारी करून महानगरपालिका पैसे जमवत असतात आणि शहरातील पायाभूत सुविधांच्या विकासकामांसाठी त्यांचा वापर केला जातो.