मागील काही दिवसांपासून मनसे-भाजप युतीच्या चर्चा रंगत आहे. मनसेमधील काही बदल, हिंदुत्वाकडे मनसेचा वळलेला कल आणि शिवसेनेवर सातत्याने करण्यात येणारी टीका यावरुन मनसे-भाजप युतीच्या चर्चा रंगत होत्या. मात्र खुद्द मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी युती होणार नसल्याचे संकते दिले त्यानंतर आता विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी यावर स्पष्टीकरण दिले. आगमी काळातील निवडणुकांकरिता मनसेशी युती होणार नसल्याचे त्यांनी सांगीतले. पुण्यात ते पत्रकारांशी बोलत होते.
पुणे महानगरपालिकेचे महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या निमंत्रणावरुन त्यांनी पुणे महानगरपालिकेला भेट दिली. यावेळी महानगरपालिकेतील भाजपच्या कारभाराचे कौतुक त्यांनी केले. सोबतच आगामी निवडणुकांत स्वबळावर लढणार असल्याचे त्यांनी सांगीतले.
देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी बैठका घेत महापालिकेतील प्रकल्पांबाबत जाणून घेतले. दरम्यान फडणवीसांनी “अभय योजना” “पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशीप तत्त्वावरील प्रकल्प, सहा मीटर रुंदीचे रस्त्यांचे रुंदीकरण या निर्णयांचे कौतुक केले. अभय योजनेचे कौतुक करतांना अामच्या हातातील ईतर महापालिकांतसुद्धा ही योजना राबवावी असे आदेश देणार असल्याचेसुद्धा फडणवीस यावेळी म्हणाले.
मनसेने आपल्या झेंड्यात बदल करत मराठी माणसासोबतच हिंदुत्व हासुद्धा आपला मुद्दा असल्याचे सर्वश्रुत केले. मनसेचे नेते सातत्याने शिवसेनेवर टीका करत असतात. त्यामुळे मनसे शिवसेनेस पर्याय होऊन भाजपशी युती होऊ शकते का अशा चर्चा रंगत होत्या. याबद्दल भाजपच्या नेत्यांना विचारले असता वैचारीकतेवर आधारीत युती आम्ही करतो. मनसेने आपली वैचारीक भूमिका स्पष्ट केल्यास युती होऊ शकते. अशा प्रतिक्रिया येत होत्या. मात्र दवेंद्र फडणवीस यांनी या चर्चावर पाणी सोडत सगळे स्पष्ट केले आहे.