केंद्रीय कृषी कायद्याला विरोध करण्यांच्या नारायण राणे यांनी चांगलाच समाचार घेतला. काँग्रेस नेते राहुल गांधी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना शेतीमधील काय समजते? ते या कायद्याला विरोधच करणार, अशी जोरदार टीका भाजप नेते आणि खासदार नारायण राणे यांनी केली.
कृषी कायद्याच्या समर्थनार्थ कणकवली येणे आयोजित केलेल्या ट्रॅक्टर रॅलीत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, आमदार रविंद्र चव्हाण आणि आमदार नितेश राणे यांच्या उपस्थित होते.आंदोलक शेतकरी ठराविक राज्यातील आहेत. आंदोलन करणारे बहुतांश दलाल आहेत, असा आरोप नारायण राणे यांनी यावेळी केला.
‘मी राज्यसभेचा सदस्य आहे. राज्यसभेत कृषी विधेयक सादर करण्यात आले तेव्हा त्यावर चांगली चर्चा झाली. विरोधकांपैकी कुणीही कृषी विधेयकाला विरोध दर्शवला नाही. याउलट अनेक विरोधक सदस्यांनी या विधेयकाचे कौतुकच केले. गेल्या ७० वर्षांत काँग्रेसला जे जमलं नाही, ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. काँग्रेसला संधी असून, शेतकऱ्यांसाठी त्यांनी काही केले नाही. आता विरोध करताहेत. आंदोलन करताहेत. शेतकऱ्यांवर बंधने लादणारे कायदे व नियम मोडीत काढण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले”, असे नारायण राण यांनी सांगितले.
माल कुठे विकायचा? कसा विकायचा? दलालांमार्फत विकायचा का? कष्टाचे पैसै मिळाले नाहीत, तर तोट्यात जाऊन विकायचा? अशी बंधने कृषी कायद्यामुळे दूर होणार आहेत. ही सर्व बंधने काढून टाकली तर मग काय चुकले? का आंदोलने केली जात आहेत? ही आंदोलने राजकीय असून, यात समेट घडून येईल, असे मला वाटत नाही. काँग्रेस नेते राहुल गांधी यांना शेतीमधील काय समजते आणि शेतकऱ्यांना पाठिंबा द्यायला निघाले आहेत.असेही ते कणकवली येथे आयोजित केलेल्या ट्रॅक्टर रॅलीदरम्यान ते बोलत होते.