नुकताच केंद्रिय गृहमंत्री आणि भाजपचे नेते अमित शहा यांचा महाराष्ट्र दौरा संपन्न झाला. नारायण राणे यांच्या वैद्यकीय महाविद्यालयाचे ऊद्घाटन करण्यासाठी ते सिंधुदुर्ग येथे आले होते. अमित शहा माघारी परतताच नारायण राणेंचे पुत्र नितीश राणे यांच्या मतदारसंघात शिवसेनेने भाजपास खिंडार पाडले आहे. वैभववाडीतील ७ नगरसेवकांनी एकाचवेळी भाजपाला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत प्रवेश केला. अमित शहा यांनी या दौर्यादरम्यान शिवसेनेवर जोरदार हल्ला चढवला होता. त्यानंतर लगेचच नगरसेवक सोडून गेल्याने अमित शहांच्या टीकेस हे प्रत्युत्तर ठरले अशी काहीशी भूमिका सेनेच्या काही नेत्यांनी घेतली होती. नितेश राणे यांच्या नतदारसंघातील हे नगरसेवक असल्यामुळे नितेश राणेंनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.
अमित शहां यांच्या दौर्याच्या पार्श्वभूमिवर “अमित शहांच्या पायगुणाने महाराष्ट्रातील महाविकासआघाडीचे सरकार जावे” अशी टीका नारायण राणे यांनी केली होती. शहांच्या पायगुणामुळे राज्यातील सरकार तर नाही पण तुमचे नगरसेवक तेवढे गेले अशी खील्ली राणेंची आणि भाजपाची ऊडवण्यात येत होती. यावर नितेश राणे यांनी एक व्हिडिओ ट्वीट करत सेनेस टोला लगावला आहे.
“व्हॅलेंटाइन डे काही दिवसांवर आहे आणि शिवसेना आमचं जुनं प्रेम आहे, जुन्या प्रेमाला कधी विसरायचं नसतं, असं सगळेच म्हणतात. वैभववाडीची सध्याची परिस्थिती पाहिली तर शिवसेनेकडे उमेदवारीसाठी मुळ शिवसैनिक सापडणार नाही. शिवसेना पक्ष हा हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष आहे, बाळासाहेब ठाकरेंवर आमचं नितांत प्रेम आहे, त्यामुळं शिवसेना पक्षाची अशी अवस्था होऊ नये, अशी माझ्यासारख्या बाळासाहेब ठाकरेंवर प्रेम करणाऱ्या कुटुंबाची भावना आहे. म्हणून हे ७ नगरसेवक व्हॅलेंटाइन डे निमित्त उद्धव ठाकरेंकडे पाठवतोय” असा टोला नितेश राणेंनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे.
“नारायण राणेंनी काही दिवसांअगोदर वैद्यकीय महाविद्यालयाच्या परवानगीसाठी ऊद्धव ठाकरेंना फोन केला होता. ऊद्धव ठाकरे यांनी याकरिता सकारात्मक प्रतिसाद दिला. आम्ही ऊद्धव ठाकरेंना काही देऊ शकत नाही आणि दिले तर ते काही घेणार नाहीत, त्यामुळे हे सात नगरसेवक त्यांना धन्यवाद आणि आभार मानण्यासाठी पाठवतो आहे. त्यांनी यांचा स्विकार करावा” असे म्हणत नितेश राणे यांनी शिवसेनेस व्हॅलेंटाईन डे च्या शुभेच्छा दिल्या आहे.
नितेश राणेंचा हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होतो आहे. शिवसेनेकडून अद्याप कुठलीही प्रतिक्रिया व्यक्त केली गेलेली नाहीये. राजकीय वर्तुळात हा व्हिडीओ चर्चेचा विषय ठरतो आहे.