चंद्रकांत पाटलांचे कोल्हापूरातील कर्तृत्व काय? शिवसेनेच्या माजी आमदाराने लगावला टोला !

22


कोल्हापूर : राष्ट्रवादीचे नेते आणि माजी गृहमंत्री यांच्या घरावर आणि कार्यालयावर CBI ने छापा टाकत कारवाई केली होती. या कारवाईनंतर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आघाडी सरकार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर उपरोक्त टीका केली होती. आता या टीकेला माजी शिवसेना आमदार आणि राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी जोरदार टोला लगावला आहे.


भाजपचे चंद्रकांत पाटील कोल्हापूरचे पालकमंत्री असताना त्यांची अकार्यक्षमता जनतेने पाहिली आहे. कोल्हापूरसाठी त्यांचे कर्तृत्व काय? त्यामुळे जनतेची जबाबदारी सांभाळणाऱ्या महाविकास आघाडीच्या नेत्यांवर बोलण्याचा त्यांना अधिकार नाही. सत्ता गेल्यामुळे भाजप नेते सैरभैर झाल्याचा टोला राजेश क्षीरसागर यांनी लगावला आहे, ते आज कोल्हापुरात पत्रकार माध्यमांशी बोलत होते.


पुढे राजेश क्षीरसागर यांनी चंद्रकांत पाटलांच्या कामावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. ते म्हणाले की, दिलेला शब्द न पाळल्यामुळे भाजप सत्तेबाहेर गेले आहेत. सत्तेत नसल्याने त्यांचे नेते सैरभैर झाले आहेत. महाराष्ट्र जनतेच्या मनात गैरसमज पसरवण्याचे काम भाजपचे नेते करत आहेत. मंत्र्यांचे राजीनामा मागणे, संभ्रम निर्माण करणे आणि वारंवार भाजप सत्तेत येणार असल्याचा दावा करून वातावरण निर्माण करण्याचे काम भाजपचे नेते करत आहेत, असे क्षीरसागर म्हणाले.


उपमुख्यमंत्री अजित पवार यांची काम करण्याची मोठी ताकद आहे. मुख्यमंत्र्यांनी प्रत्येकाला स्वतःची जबाबदारी नेमून दिली आहे. ज्या पुण्यातून चंद्रकांत पाटील निवडून आले आहेत, त्या पुण्याची अजित पवार यांनी दहावेळा हद्दवाढ केली आहे. महानगरपालिकेसह शहराचा विकास मोठ्या प्रमाणात केला आहे. तर त्या उलट चंद्रकांत पाटील यांनी स्वतःला तपासून घ्यावे. कोल्हापूरचे पालकमंत्री असताना त्यांनी कोल्हापूरची हद्दवाढ किती वेळा केली? कोल्हापूरचा विकास काय केला? असा सवाल राजेश क्षीरसागर यांनी केला.