नव्या कृषी कायद्या विरोधात शेतकरी आंदोलन करत आहेत. गेल्या 11 दिवसांपासून राजधानी दिल्लीत आंदोलन करणार्या शेतकरी आणि सरकारमधील पाचव्या फेरीतील बैठकीनंतर अजूनही कोणता निर्णय घेण्यात आला नाही. यामुळे शेतकऱ्यांनी 8 डिसेंबर रोजी ‘भारत बंद‘ ची घोषणा केली आहे. या भारत बंद दरम्यान 8 तारखेला भारत सकाळपासून संध्याकाळपर्यंत बंद राहणार असल्याची माहिती मिळत आहे.
सिंघू सीमेवर जय किसान चळवळीतील योगेंद्र यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार, भारत बंद दरम्यान 8 तारखेला सकाळपासून संध्याकाळपर्यंत भारत बंद ठेवण्यात येणार आहे. यादरम्यान काय सुरू राहणार, काय बंद राहणार हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. केंद्र सरकारच्या कृषी आणि पणन कायद्याविरोधात राज्यातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या आवारातील तमाम माथाडी कामगार आणि व्यापाऱ्यांचा 8 डिसेंबर रोजी संप करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
मुंबईतील एपीएमसीमधील भाजी, फळ आणि कांदा-बटाटा मार्केट एक दिवस बंद राहणार आहे. 8 डिसेंबरला दूध, फळे आणि भाजीपाल्याच्या सेवा पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच वाहतुकीवरही बंदी असणार आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विवाहसोहळे आणि आपत्कालीन सेवांवर कोणतंही बंधन असणार नाही अशी माहिती योगेंद्र यादव यांनी दिली आहे. सर्व स्तरातून शेतकऱ्यांना पाठिंबा देत आहेत. त्यामुळे 8 तारखेला सर्व व्यवहार आणि वाहतूक ठप्प राहिल असे समजत आहे.