सांगली जिल्हा कोरोनारुग्णांची स्मशानभूमी होते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे

29

सांगली – राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने ब्रेक द चेनअंतर्गत कडक लॉकडाऊन जाहीर केला आहे. मागील काही दिवसांपासून राज्यातील १२ जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव आणि रुग्ण संख्या आटोक्यात आणण्यात यश आले आहे. परंतु सांगलीमध्ये कोरोनाचा हाहाकार सुरु आहे. सांगलीत कोरोना रुग्णांची संख्या वाढली असल्यामुळे रेमडेसिवीर, ऑक्सीजनचा तुटवडा निर्माण झाला आहे. परंतु प्रशासनाकडून नागरिकांची दिशाभूल करण्यात येत असा आरोप होत आहे.


कोरोनाची दुसरी लाट येणार हे माहीत असून देखील राज्य सरकारने कोरोनाच्या बाबतीत काहीच उपाययोजना केल्या नाहीत, अशा शब्दात माजी कृषी राज्यमंत्री आमदार सदाभाऊ खोत यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. तर सांगली जिल्हा कोरोना रुग्णांची स्मशानभूमी होतो की काय अशी परिस्थिती निर्माण झालीय अशी टीका त्यांनी केली आहे.


ऑक्सिजन नसल्याने चार रुग्णांचा मृत्यूही झाला आहे. तरीही मंत्री म्हणतात जिल्ह्यात कशाचीच कमतरता नाही. मंत्र्यांनो, खोटी माहिती देऊन हवेत गोळीबार करू नका. हवेतून जमिनीवर या, असं आवाहन सदाभाऊ खोत यांनी केलं आहे.
रेमडेसिवीर इंजेक्शनचा साठा गुजरातमधून येणार होता. हा साठा आला असता तर रुग्णांना इंजेक्शन मिळाले असते. पण त्या उद्योजकाला रात्रीच उचलून धमकावल्या गेलं. या प्रकारामुळे उद्योजकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. तुम्ही उद्योजकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण कराल तर राज्यातील उद्योजक राज्याबाहेर जातील, अशी भीती व्यक्त करतानाच या सरकारने राज्यात ठोकशाही सुरू केल्याचा आरोपही खोत यांनी केला.