मुंबईः ‘पश्चिम बंगालचा राजकीय इतिहास नेहमीच रक्तरंजित आणि हिंसाचारानं भरलेला आहे. या हिंसेला कोण चिथावणी देतंय याचा शोध घेतला पाहिजे,’ असं शिवसेना नेते संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
पश्चिम बंगालच्या निकालानंतर तिथं हिंसा उसळली आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाष्य केलं आहे. तसंच, ‘हिंसा रोखण्याचे काम हे तिथेल सत्ताधारी पक्षाचं असतं त्यामुळं दोन्ही पक्षानं संयम राखायला हवा,’ असा सल्लाही संजय राऊत यांनी दिला आहे.
पश्चिम बंगालमधील हिंसाचाराच्या बातम्या दुखःद आहेत. पश्चिम बंगालच्या जनतेचा निर्णय ऐतिहासिक आणि क्रांतीकारक आहे. देशातील जनतेच्या मनात ही भावना उमटली आहे. परंतु, बंगालमध्ये जी परिस्थिती निर्माण झाली आहे. ती पाहता दोन्ही पक्षांनी संयम राखला पाहिजे. आज देशातील परिस्थिती गंभीर आहे. त्यामुळं सगळ्यांनी वाद, मतभेत मिटवले पाहिजेत,’ असं संजय राऊत म्हणाले आहेत. तसंच, ‘हिंसा घडवणारे बंगालचे आहेत की बाहेरुन आले आहेत हे पाहावं लागेल. पश्चिम बंगालमधील हिंसेला कोण चिथावणी देतंय याचा शोध घ्यावा लागेल,’ अशी शंकाही त्यांनी उपस्थित केली आहे.