छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्माअगोदर अनेक अनाकलनीय घटना इतिहासात घडल्या. त्यातील एक महत्वाची घटना म्हणजे, राजमाता जिजाऊंचे वडील लखुजी जाधव, त्यांचे दोन मुलं आणि एक नातू यांची एकत्र झालेली हत्या. त्याचा मोठा आघात राजमाता जिजाऊ यांच्यावर झाला…
जिजाऊंचे वडील लखुजी जाधव हे मोगलांकडे होते. अहमदनगरचा निजामशहाचा प्रधानमंत्री असलेला मलिक अंबर याने मोगलांना मिळालेले लखुजी जाधव यांना पुन्हा निजामशाहीत आणले. प्रधानमंत्री मलिक अंबरच्या मृत्यूनंतर त्याचा एक मुलगा फत्तेखान वजीर तर दुसरा मुलगा हमीद खान सरदार बनला. हमीद खान आदिलशहाचा विश्वासू आणि मर्जितला सरदार होता. पुढे हाच आवडता सरदार हमीद खान बापाच्या जागी म्हणजेच मलिक अंबरच्या जागी प्रधानमंत्री बनला.
त्याच हमीद खानाने निजामशहाचे कान भरले. “लखुजी जाधव वृध्द झाले आहेत. पण, ते अनुभवी आहेत. आपल्या राज्यातील सर्व गुप्त गोष्टी लखुजी जाधवांना माहित आहेत. जाधवराव मोगलांना मिळाले तर, निजामशाही धोक्यात येईल. आपला घात होईल.” असे हमीद खानाचे ऐकुन निजामशहाने लखुजी जाधव यांना सहकुटुंब दरबारात येण्याचे निमंत्रण दिले. निजामाचे हे निमंत्रण फसवे असेल, याची साधी कल्पना सुद्धा लखुजी जाधव यांच्या मनात आली नाही.
१५/७/१६२९ यादिवशी राजमाता जिजाऊंचे वडील लखोजी जाधव आपल्या दोन मुले आणि एका नातवासह निजामाच्या भेटीला दरबारात पोहचले. अचलोजी आणि रघुजी हे दोन मुलं, तसेच नातू यशवंत सोबत होते. ठरल्याप्रमाणे निजामशहाने लखुजी जाधव आणि त्यांचे दोन मुलं अचलोजी, रघुजी आणि नातू यशवंत यांची कपटाने हत्या केली. लखुजी जाधव आणि त्यांच्या तीनही वारसांची एकाच वेळी निजामशहाने हत्या घडवून आणली. वडीलांच्या आणि भावांच्या अशा आकस्मित मृत्यूने राजमाता जिजाबाई यांना मोठा धक्का बसला. ही घटना जेव्हां घडली त्यावेळी शिवराय हे जिजाऊंच्या उदरात वाढत होते…
- रोहित गिरी 9604312182
- संदर्भ : जगातील सर्वोत्तम राजा – काशिनाथ मढवी