लॉकडाऊनचे नियम शिथिल होण्यासोबतच अनेक सेवा देखील राज्य सरकारने सुरू केल्या आहेत. राज्यपाल कोश्यारी यांनी राज्यातील सर्व विद्यापीठांच्या कुलगुरूंची व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे बैठक घेतली आहे. मात्र शाळा सुरू झाल्या असल्या तरी महाविद्यालये सुरू करण्याचा निर्णय ठाकरे सरकारने अद्याप घेतलेला नाही.
या बैठकीला उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे प्रधान सचिव ओ. पी. गुप्ता तसेच राज्यातील सर्व 20 विद्यापीठांचे कुलगुरू उपस्थित होते. महाविद्यालयांतील वर्ग त्वरित सुरू करण्याची विद्यापीठांची तयारी आहे. विद्यार्थ्यांची देखील विद्यापीठ सुरू करण्याची मागणी आहे. मात्र सरकारच्या परवानगीशिवाय महाविद्यालये सुरू करता येत नाहीत.
महाविद्यालय कधी सुरू होणार ? असा प्रश्न सातत्याने विद्यार्थ्यांकडून विचारला जात आहे. आता प्रत्यक्ष वर्ग त्वरित सुरू करण्याची विद्यापीठांना अनुमती द्यावी, अशी मागणी सर्व विद्यापीठांच्या कुलगुरूंनी थेट राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे केली. यानंतर महाविद्यालये सुरू न करण्याचा सरकारचा निर्णय विसंगत आणि विपरीत असल्याचे राज्यपाल म्हणाले आहेत.
विद्यापीठांनी आपली शैक्षणिक वर्ष ऑनलाईन पद्धतीने सुरू केली आहेत. आता कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात येत आहे. अशा वेळी महाविद्यालयीन वर्ग सुरू करता येतील का किंवा गट पाडून चालविता येतील का, याचा विद्यापीठांनी विचार करावा, असे राज्यपालांनी सांगितले. विद्यापीठ अनुदान आयोगानेही महाविद्यालय कसे सुरू करावे याबाबत निर्देश दिले आहेत. त्यामुळे विद्यापीठांनी वर्ग सुरू करण्याबद्दल आपण होऊन पुढाकार घेतला पाहिजे, असे राज्यपालांनी सांगितले.