राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप झाल्यानंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. रेणू शर्मा नामक महिलेने धनंजय मुंडे यांच्याविरोधात पोलिस तक्रार दाखल केली आहे. सदरील तक्रारीबाबत स्वत: धनंजय मुंडे यांनी फेसबुकवर पोस्ट टाकत स्पष्टीकरण दिलं आहे. या फेसबुक पोस्ट मध्ये अनेक धक्कादायक खुलासे धनंजय मुंडे यांनी केले आहेत.
विरोधी पक्ष भाजपने मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे, तर राष्ट्रवादीचे नेते प्रतिक्रिया देताना सावध पवित्रा घेत आहेत. मात्र, शिवसेनेचे नेते, मंत्री अब्दुल सत्तार यांनी एका कार्यक्रमादरम्यान सत्तार यांना धनंजय मुंडे प्रकरणाबाबत प्रश्न विचारला असता, त्यांनी ‘प्यार किया तो डरना क्या?’, अशा बिनधास्त शब्दात धनंजय मुंडे यांची पाठराखण केली आहे.
“धनंजय मुंडे यांनी त्यांचे संबंध लपवून ठेवलेले नाहीत. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी सर्व खुलासा केला आहे. त्यांनी त्यांची बाजू महाराष्ट्रासमोर मांडली आहे. तसंच दोघांच्या संमतीने असलेल्या प्रेमाची कबुली दिली आहे. तर मग प्यार किया तो डरना क्या?”, असं म्हणत त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांनी गोपीनाथ मुंडे यांना वापरलेल्या वाक्याची आठवण सत्तार यांनी करुन दिली.