एल्गार परिषदेत प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी अलिगड मुस्लिम विद्यापीठाचा विद्यार्थी शरजिल उस्मानी विरोधात काल भाजपनं तक्रार दाखल केली आहे. शरजील उस्मानी नावाचा एक इसम पुण्यात येतो आणि त्याठिकाणी हिंदूंना सडक्या बुद्धिचा म्हणतो, त्याचा हा व्हिडीओ असताना त्याच्यावर कारवाई का नाही? शिवसेना सत्तेसाठी मिंधी झालीय, सत्तेला नतमस्तक आहे, त्यामुळे शिवसेना यासंदर्भात बोलूच शकत नाही, असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.
पुण्यातील स्वारगेट पोलिस ठाण्यात ही तक्रार दाखल करण्यात आली आहे. या कार्यक्रमाला याआधीच अनेकांनी विरोध केला होता. मात्र, पुणे पोलिसांनी परवानगी दिल्यानंतर एल्गार परिषद ३० जानेवारीला पार पडली. शरजिल उस्मानी याने पुणे येथील एल्गार परिषदेत भाषणाची सुरुवात करतानाच, ‘आजचा हिंदू समाज, हिंदुस्तानात हिंदू समाज वाईटरित्या सडला आहे. मी इथे एक अल्पसंख्याक तरुण म्हणून आलो असून युद्धाची सुरुवात करण्यासाठी आलो आहे,’ असे आक्षेपार्ह विधाने त्याने केली होती.
दरम्यान, ‘हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रात कुणीही यावे आणि अशी विधाने करुन वातावरण खराब करावे, हे आम्हाला मान्य नाही. ते आपल्यालाही मान्य नसेल, अशी अपेक्षा आम्ही महाराष्ट्रातील जनता आणि समस्त हिंदू समाज करतोय’ असं म्हणत फडणवीसांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे शरजिल उस्मानीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे