माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मी पुन्हा येईल अशी घोषणा केली होती. मात्र त्यांची ती घोषणा प्रत्यक्षात येऊ शकली नाही. त्यामुळे त्यांच्या विरोधकांनी या घोषणेची टिंगल केली होती. त्यावर आता रिपाईचे अध्यक्ष रामदास आठवलेंनी प्रतिक्रिया देत त्या घोषणेचे गुपित सांगितलं आहे. पुण्यात ते माध्यमांशी बोलत होते.
“राष्ट्रवादीचे नेते अजित पवार पुन्हा एकदा साथ देतील आणि सरकार येईल, अशी आशा विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना आहे, म्हणूनच ते ‘मी पुन्हा येईन’ असं म्हणतात” असं वक्तव्य रिपाइं अध्यक्ष रामदास आठवले यांनी केलं आहे.
“देवेंद्र फडणवीस मी येईन, अशासाठी म्हणतात, की अजितदादा एक दिवस त्यांच्यासोबत येतील, अशी त्यांना अपेक्षा आहे. अजितदादा एकदा तिथे जाऊन आलेले आहेत, त्यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीसांना अपेक्षा आहे, की एक दिवस अजित पवार आपल्यासोबत येतील. आणि पुन्हा सरकार स्थापन करण्याची संधी आपल्याला मिळेल. अशी अपेक्षा असल्याने ते पुन्हा-पुन्हा सांगतात की मी पुन्हा येईन” असं रामदास आठवले म्हणाले.