आक्षेपार्ह ट्विट करणाऱ्या प्रत्येकावर कारवाई करणार का?; हायकोर्टाचा ठाकरे सरकारला सवाल

28

ट्विटरवर आक्षेपार्ह ट्विट करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीवर कारवाई करण्याचा विचार राज्य सरकारचा आहे का, असा सवाल उच्च न्यायालयाने राज्य सरकारला मंगळवारी केला. सुनैना होले हिने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांचा मुलगा आदित्य यांच्याबाबत आक्षेपार्ह ट्विट केल्याबद्दल मुंबई आणि पालघर पोलिसांनी तिच्यावर गुन्हा नोंदविला.

गुन्हा रद्द करण्यासाठी होले हिने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. या याचिकेवरील सुनावणी न्या. एस.एस. शिंदे व न्या. एम.एस. कर्णिक यांच्या खंडपीठापुढे होती. होले हिने सरकारच्या धोरणावर ट्विटरद्वारे टीका केली, असे होले हिचे वकील अभिनव चंद्रचूड यांनी न्यायालयाला सांगितले. होलेला मोकळे सोडता येणार नाही.

सामान्य नागरिकांना राज्यकर्त्यांवर व सरकारच्या धोरणांवर टीका करताना संयम बाळगला पाहिजे, असे वाय.पी. याग्निक यांनी न्यायालयाला सांगितले. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या अधिकारामुळे अन्य नागरिकांच्या मूलभूत अधिकारांचे उल्लंघन होणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे. लोकशाहीमध्ये सरकारी कार्यालयांना लोकांकडून टीका सहन करावी लागेल, असे निरीक्षण न्यायालयाने नाेंदवले