अॅड. शिवाजी जाधव, मुंबई
दोन किंवा जास्त सुपरस्टार अभिनेते सोबत घेऊन चित्रपट करताना निर्माते आणि दिग्दर्शकांना प्रत्येकाची मर्जी राखत चित्रपट पूर्ण करावा लागतो, अभिनेत्यांना एकमेकांविषयी ईर्षा, हेवा असते जसे की दुसऱ्याला माझ्यापेक्षा जास्त संवाद असतील, त्या त्या काळातील प्रसिध्द अभिनेत्री कोणाच्या सोबत असेल, चित्रीकरण कोणाचं जास्त असेल, एडिटिंग मध्ये कोणाचे जास्त शॉट्स कटतील आणि कोणाचे राहतील, जास्तीचा स्क्रीनटाईम कोणाला मिळेल, प्रोमोशन मध्ये कोणाला जास्त महत्व असेल इत्यादी बाबींमुळे त्यांच्यात चित्रपट चित्रीकरण युनिट अंतर्गतच प्रचंड संघर्ष असतात. या सर्व बाबी असतानाही आपल्याला मिळालेला चित्रपट कसा यशस्वी होईल हेच त्या सर्व युनिटचे अंतिम ध्येय असतो आणि तोच ध्येय समोर ठेवून सर्वांनी काम केलं तर चित्रपट यशस्वी झाल्याशिवाय राहत नाही याची उदाहरणे अनेक सापडतील आपल्याला.
अगदी तशीच गत आता नांदेड मध्ये झाली आहे मागच्या काही वर्षांपासून पारंपरिक राजकीय शत्रू होऊन बसलेले नुकतीच भाजपमध्ये प्रवेश घेऊन राज्यसभेवर बिनविरोध निवडून गेलेले माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि विद्यमान खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्यात. आता दोघेही भाजपमध्ये आहेत आणि त्यांचे अंतिम ध्येय आहे अंतर्गत राजकीय हेवेदावे बाजूला सारून नांदेडमधून भाजपचा खासदार निवडून आणणे व पंतप्रधान नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा सरकार बनवण्यास मदत करणे.
नांदेड लोकसभा म्हणजे काँग्रेसचं गड आहे कारण काही अपवाद वगळता बहुतांश वेळी इथले खासदार काँग्रेसचेच राहिले आहेत. ३ वेळचे खासदार असलेले आपले भावोजी भास्करराव पाटील खतगावकर यांच्या ऐवजी २०१४ ला मोदी लाटेत अशोकराव चव्हाण यांनी स्वतः लोकसभा लढवली व जिंकली होती. आदर्श घोटाळ्याच्या कथित आरोपांनंतर अशोकराव यांनी राजीनामा दिला होता त्यानंतर ही त्यांची पहिलीच निवडणूक होती. पुढे २०१४ विधानसभा निवडणुकीपूर्वीच खतगावकर यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली का तर त्यांना चव्हाणांकडू सन्मानाची वागणूक मिळत नव्हती. नंतर भाजपमध्ये डेरेदाखल झाले व पुन्हा २०२२ला देगलूर-बिलोली विधानसभा पोटनिवडणुतिच्या तोंडावर सुनेच्या राजकीय भवितव्यासाठी काँग्रेसमध्ये परतले. २०१९ ला नांदेड लोकसभेत झालेल्या अशोकराव चव्हाण यांच्या परभावत खतगावकर यांचाही हातभार आहे बोलले जाते.
स्वतः चा लोकसभा मतदारसंघ नसूनही चिखलीकर यांनी तत्कालीन एकसंघ शिवसेना व भाजप महायुतीचे उमेदवार म्हणून त्यांनी चव्हाणांचा पराभव केला. २०१९ ला वंचित आणि एमआयएमने तिसरा पर्याय उभा करण्याचा प्रयत्न केला त्याआधी त्यांनी आघाडीत जायचा प्रयत्नही केला पण जागांच्या वाटाघाटीत ते कमी पडले याचे परिणाम वंचितने आघाडीला बहुतांश ठिकाणी डॅमेज केले असे बोलले जाते त्यातील महत्वाची एक जागा म्हणजे नांदेड लोकसभा. वंचितकडून प्रा यशपाल भिंगे यांनी ती जागा लढवली होती त्यांना १ लाख ६६ हजारापेक्षा जास्त मतं मिळाली होती आणि प्रताप पाटील ४० हजार मताच्या फरकाने निवडून आले होते. आता केवळ वंचितमुळेच चव्हाणांचा पराभव झाला असे म्हणणे १००% खरे नाही. वंचितला मिळालेली सर्वच्या सर्व मतं ही काँग्रेसचीच होती असे सांगता येत नाही कारण वंचितने भाजपचीही मतं घेतली होती.
नांदेड लोकसभा मतदारसंघातील ६ विधांसभांपैकी
नांदेड दक्षिण आणि देगलूर असे २ ठिकाणी विद्यमान आमदार हे काँग्रेसचे आहेत हे दोन्ही आमदार येणाऱ्या काळात चव्हाणांसोबत जाणार हे सांगायला वेगळ्या ज्योतिषांची गरज नाही तरीही ऐनवेळी काय होईल सांगता येत नाही. चव्हाणांनी भाजपमध्ये येण्यासाठी भोकर विधानसभा सदस्यपदाचा राजीनामा दिला ती रिक्त आहे. नांदेड उत्तरचे विद्यमान आमदार शिवसेनेचे आहेत नायगाव आणि मुखेड विधानसभा भाजपच्या ताब्यात आहेत अर्थात नांदेड लोकसभेतील सर्वच्या सर्व विधानसभा (दोन्ही काँग्रेसचे आमदार भाजपमध्ये आल्यास) जागा महायुतीच्या ताब्यात आहेत. म्हणून नांदेड लोकसभेत महायुती विजयाच्या समीप दिसत आहेत.
काँग्रेस नेते आणि त्यांच्या समर्थकांनी कितीही सांगितलं चव्हाण गेल्यामुळे काहीही फरक पडत नाही पण चव्हाण म्हणजेच जिल्ह्यात काँग्रेस असे चित्र आहे. काही कायम भाजपविरोधी भमिका घेणारे स्थानिक मुस्लिम, दलित नेते वगळता काँग्रेसचे बहुतांश स्थानिक नेते ज्यात आजी-माजी मंत्री, खासदार, आमदार, नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, जिल्हा बँक संचालक इत्यादी सगळेच चव्हाणांसोबत जातील आणि ते म्हणतील तेच राजकीय निर्णय घेतील. पूर्वीच्या भाजपच्या ताकदीला आता चव्हाण समर्थकांची जोड मिळाल्यामुळे भाजप निर्विवादपणे मजबूत झाली आहे.
चव्हाण भाजपमध्ये गेल्यामुळे मविआचे चित्रच पालटले आहेत ही जागा मिळवण्यासाठी वंचित आता जोरदार प्रयत्न करेल आणि त्यांनाच नांदेड लोकसभा मिळण्याची दाट शक्यता आहे कारण काँग्रेस ही जागा घेऊन काय करणार कारण त्यांच्याकडे तगडा, पूर्ण लोकसभा मतदारसंघावर प्रभाव असलेला उमेदवारच नाही. उमेदवार निवडीत वंचितलाही समस्यांना सामोरे जावे लागणार त्यांचे २०१९ चे उमेदवार यशपाल भिंगे काही दिवसांपूर्वीच भारतराष्ट्र समितीत प्रवेश घेतला होता तेलंगाणातील बीआरएसच्या पराभवानंतर भिंगे फारसे सक्रिय नाहीत. वंचितला किंबहुना मविआला नांदेड साठी एमआयएमला साद घालावी लागेल. नांदेड बाबत मविआ जागावाटप आणि उमेदवार निवड यातच गुरटफटून राहील भाजपच्या विरोधात त्यांना तुल्यबळ उमेदवार मिळणे कठीणच दिसतंय.
विद्यमान खासदार चिखलीकर हेच भाजपचे उमेदवार असतील हे जवळपास निश्चित झाले आहे. सुरुवातीला प्रताप पाटील यांना विधानसभेत जायची इच्छा झाली होती पण पक्षांनी त्यांना लोकसभेच्या तयारीला लागायची सूचना दिल्यामुळे ते तसे तयारीला लागले आहेत. अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वातील काँग्रेसची जिल्ह्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांवर एकहाती सत्ता होती ती आता निश्चितच भाजपकडे येईल असा राजूरकर यांना दावा केला आहे व तसेच होण्याची शक्यता दिसत आहे. लोकसभा निवडणुकीत मुखेड, देगलूर आणि नायगाव विधानसभा मतदारसंघातील चव्हाण यांच्या प्रवेशाआधी भाजपात असलेले नेते आमदार तुषार राठोड, आमदार राजेश पवार, माजी आमदार सुभाष साबणे, लोकसभा प्रमुख, माजी नांदेड जिल्हाध्यक्ष व्यंकटराव पाटील गोजेगावकर इत्यादी आणि आता पुन्हा चव्हाणांच्या सोबत भाजपमध्ये आलेले भास्करराव पाटील खतगावकर, त्यांच्या स्नुषा मिनलताई खतगावकर आणि येत्या काळात चव्हाणांमुळे भाजप मध्ये येण्याची दाट शक्यता असलेले माजी आमदार हणमंत पाटील बेटमोगरेकर, आमदार जितेश अंतापुरकर, माजी आमदार अविनाश घाटे, माजी आमदार वसंतराव चव्हाण इत्यादी नेत्यांनी एकसुरात काम केले तर या तीन मतदारसंघातुन भाजपच्या उमेदवाराला नक्कीच मोठ्या प्रमाणात विजयी मताधिक्य मिळेल.
भोकर म्हणजे अशोक चव्हाण असे समीकरण असल्यामुळे तेथूनही भाजप उमेदवाराला चांगली लीड मिळेल. नांदेड शहरातील दोन्ही मतदारसंघात भाजपचे आधीचे नेते दिलीप कंदकुर्ते, प्रवीण साले, संतुकराव हंबर्डे, सुधाकर भोयर, देविदास राठोड आणि आता नव्याने चव्हाणांसोबत आलेले व येणाऱ्या काळात येण्याची शक्यता असलेले अमर राजुरकर, ओमप्रकाश पोखर्णा, डीपी सावंत, मोहनराव हंबर्डे इत्यादी नेत्यांना एकमताने काम केले तर भोकरसह नांदेड शहरातील दोन्ही मतदारसंघातून भाजप उमेदवाराला मताधिक्य असले. यांच्या सर्वांच्या साथीला जिल्यातून जाणारे दोन्ही राज्यसभेचे खासदार अशोकराव चव्हाण व अजित गोपछाडे आणि विधानपरिषद आमदार राम पाटील रातोळीकर असणार आहेत. मित्रपक्ष शिवसेनेचे हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील आणि आमदार बालाजी कल्याणकर आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते मदतीला असणार आहेत.
नांदेड लोकसभा मतदारसंघात सामाजिक बलाबल पाहिल्यास ओबीसी, मराठा आणि दलित-आदिवासी जवळजवळ एकसमान आहे. यांच्या खालोखाल मुस्लिम समाज आहे. ओबीसींमध्ये बंजारा, हटकर, धनगर, यलम, पद्मशाली इत्यादींचे मतदान अधिकचे आहेत. लिंगायत समाजही दखल घेण्याइतका आहे. नांदेड शहरात शीख समुदायही दखलपात्र आहे.
भाजपसाठी सगळं आलबेल दिसत असूनही त्यांच्या साठी चिंतेच्या व मविआ उमेदवाराच्या बाजूने असलेल्या बाबी म्हणजे मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनाचा प्रभाव नाही म्हंटलं तरी मराठा समाजाच्या मतदारांवर पडणार आहे याचा थोडाफार फटका भाजपला पडण्याची शक्यता आहे कारण आंदोलकांची भूमिका ही सरकारविरोधी आहे, काँग्रेसमध्ये असताना अशोक चव्हाणांना नेते समजून त्यांनी म्हणेल ती पूर्व दिशा म्हणणारे मुस्लिम मतदार त्यांच्यासोबत कितपत जातील यातही शंका आहे कारण बहुतांश मुस्लिम समुदाय कायम भाजपविरोधी भूमिका घेताना दिसतं. मविआकडून वंचितचे उमेदवार असल्यास किंवा वंचितचे नेते बाळासाहेब आंबेडकर मविआच्या उमेदवारासाठी या ठिकाणी प्रचार सभा केल्यास २०१९ प्रमाणे दलित मतदारही विभागाला जाईल व त्यातील काही मतदार भाजपविरोधी भूमिका घेण्याची शक्यता आहे. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे काँग्रेसचे कोणकोणते नेते चव्हाणांसोबत भाजप बरोबर येतील ते पाहण्यासारखे राहील कारण त्यांना पण त्यांचे राजकीय भवितव्य पाहावे लागणार आहे.