नरेंद्र मोदींच्या विरोधात वाराणसीमधून निवडणूक लढवणार :नाना पटोले

46

भाजपमध्ये असताना थेट नरेंद्र मोदी यांना आव्हान देत खासदारकीचा राजीनामा नाना पटोले यांनी दिला होता. आता त्यांनी थेट नरेंद्र मोदींविरोधात वाराणसी मधून निवडणूक लढवण्याची तयारी असल्याचं स्पष्ट केले आहे.

माझी नियुक्ती झाल्यामुळे जनतेत विश्वास निर्माण झालायत्याचा फायदा पक्षाला होईल. आम्ही सामान्य कार्यकर्त्यांसह जनतेसमोर जाऊ त्यांच्या जवळ जाऊन कार्य करू, असंही नाना पटोलेंनी सांगितले.

पक्षानं आदेश देण्याची गरज असल्याचं त्यांनी सांगितलं. विधानपरिषेदच्या राज्यपाल नियुक्त सदस्यांच्या प्रश्नी राज्यपालांवर नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचा दबाव आहे का हा प्रश्न आहे, असेही ते म्हणाले.

राज्यपाल नियुक्त आमदारांच्या प्रश्नाबद्दल बोलताना त्यांनी कोर्टात जाण्याचा इशारा देखील दिला आहे. विधान परिषेदतील राज्यपाल नियुक्त सदस्य हे निवडून दिलेल्या सरकारकडून सूचित केलेले असतात. त्यांची नियुक्ती मुद्दाम अडवून ठेवणे योग्य नाही. हा प्रश्न असाच प्रलंबित राहिल्यास आम्ही न्यायालयात जाऊ, असं वक्तव्य पटोले यांनी केलं आहे.

पदवीधरमध्ये आपण बघितलं की काँग्रेसमध्ये कुठलेही गट नाही म्हणून आम्हाला विजय मिळविता आला. ज्या राज्यात काँग्रेसचे सरकार आहे तिथे बॅलटवर निवडणुका घ्यावात, अशा राहुल गांधींच्या सूचना असल्याचं पटोलंनी स्पष्ट केले.