शिवसेनेनं राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससोबत महाविकास आघाडीचं सरकार स्थापन केलं. यानंतर, हे तीन पक्षांचं सरकार जास्त दिवस टिकणार नाही. असं भाकीत वर्तविले जाऊ लागले. मात्र, महाराष्ट्र सरकारने एक वर्ष पूर्ण केलं आहे. कालच शरद पवार म्हणाले की, ठाकरे सरकारला कुणीही पाडू शकत नाही.
नुकत्याच झालेल्या पदवीधर मतदारसंघात शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस सोबत लढले. त्यामुळे आता आगामी सगळ्याच निवडणुकीत हे तिन्ही पक्ष एकत्रित लढतील अशी अपेक्षा होती. मात्र कोल्हापुरात असं होताना पाहायला मिळत नाहीय. मंत्री सतेज पाटील यांनी तसं स्पष्ट सांगितले आहे.
कोल्हापूर महापालिकेत काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेना एकत्र लढणार, अशी चर्चा काही दिवसांपासून सुरू होती. मात्र आता या चर्चेला मंत्री सतेज पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी पूर्णविराम दिला आहे. कोल्हापूर महापालिकेची निवडणूक काँग्रेस पक्ष स्वबळावर लढणार आहे. निवडणुकीनंतर सत्ता स्थापनेसाठी महाविकास आघाडी स्थापन करण्यात येईल, असे पालकमंत्री सतेज पाटील यांनी स्पष्ट केले.