दिल्ली सिमेवरील शेतकरी आंदोलन दिवसेंदिवस अधिकच चिघळत आहे. ७९ दिवसांपासून शेतकरी आंदोलन करीत आहे. विरोधकांचासुद्धा शेतकर्यांना प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. शेतकरी नेते राकेश टीकैत यांनी पुन्हा सरकारला आवाहन दिले आहे. “सरकारच्या दडपशाही भूमिकेला न जुमानता कायदे माघे घेतल्याशिवाय आम्ही माघारी परतणार नाहीच, आता तर संपूर्ण देशात मार्च काढणार आहोत. तसेच गुजरात केंद्राच्या नियंत्रणातून मुक्त करणार.” असे राकेश टीकैत यावेळी म्हणाले.
हरयाणाच्या बहादूरगडमध्ये किसान महापंचायतचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राकेश टीकैत बोलत होते. राकेश टीकैत पुढे म्हणाले ” हे आंदोलन दीर्घकाळ चालणारे आहे. देशभरात मार्च काढण्याची मागणी शेतकर्यांकडून होते आहे. त्यामुळे संपूर्ण देशभर मार्च काढण्याच्या तयारीत आम्ही आहोत. परंतू याअगोदर गुजरातला केंद्राच्या नियंत्रणातून मुक्त करणे अावश्यक आहे. गुजरातमधील आंदोलन करणार्या शेतकर्यांना दडपण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे लवकरच गुजरात केंद्राच्या नियंत्रणातून मुक्त करणार आहोत.”
“आदोलन दीर्घकाळ चालविण्याची तयारी झालेली आहे. सिंघू सिमा आमचे कार्यालय आहे. आम्ही चर्चेसाठी तयार आहोत. पंरतू दिल्ली सिमांवर खिळे उपटल्याशिवाय आम्ही चर्चेस येणार नाही. लोकसभेत राहुल गांधी यांनी सरकारवर निशाणा साधत हम दो हमारे दो असे विधान केले आहे. हे विधान एकदम बरोबर आहे” असेसुद्धा टीकैत यावेळी म्हणाले.
संपूर्ण देशभरात शेतकरी आंदोलनाविषयी जनजागृती करण्याचासाठी आंदोलकांनी कंबर कसली आहे. आगामी काळात विधानसभा निवडणुका येणार आहेत. शेतकर्यांच्या या भूमिकेमुळे या विधानसभा निवडणुकांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. कॉंग्रेस शेतकर्यांच्या समर्थनार्थ मैदानात उतरली आहे. शेतकर्यांनी आपले आंदोलन देशभर पसरवल्यास नक्कीच भाजपला याचे परिणाम भाोगावे लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत अाहे.