दुसऱ्या लाटेनं हाहाकार माजवल्यामुळे भारतामध्ये दिवसागणिक कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. 15 दिवसांपासून दररोज तीन लाखांपेक्षा जास्त नवीन रुग्ण आढळत आहेत. आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा उडालाय. ऑक्सिजन आणि लसींचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झालाय. अशा परिस्थिती देशात पुन्हा लॉकडाउन लावणार का? असा प्रश्न सर्वसामान्यांना सतावत आहे. बुधवारी पत्रकार परिषदेत नीती आयोगानं याबाबतचं स्पष्टीकरण दिलं आहे.
नीती आयोगातील आरोग्य विभागाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांनी देशात लॉकडाउन लागणार का? या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे. बुधवारी झालेल्या पत्रकार परिषदेत पॉल म्हणाले की, ‘कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी केंद्र सरकारने राज्यांना मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. पुढच्या काळात आणखी कडक उपाययोजनांची अथवा लॉकडाउनची गरज पडली तर त्यावर आधी चर्चा केली जाईल. त्यानंतरच योग्य तो निर्णय घेतला जाईल.’
कोरोना महामारीचा मोठ्या प्रमाणात संसर्ग होत आहे. ही साखळी तोडण्यासाठी कडक निर्बंध लावले जाऊ शकतात. राज्यांना याबाबतच्या सूचनाही जारी करण्यात आल्या आहेत. वाढत्या संसर्गामुळे काही राज्यात कडक निर्बंध लावण्यात आलेत.
त्यामुळे नागरिकांच्या वाहतुकीवर बंधनं आणली जातात. यासंबंधी २९ एप्रिलला केंद्र सरकारने मार्गदर्शक सूचना जारी केल्यात. प्रादुर्भाव रोखण्यासाठी ज्या भागात संसर्गाचा दर १० टक्क्यांहून अधिक आहे तिथे रात्रीची संचारबंदी लागू करण्याची सूचना (impose restrictions) दिली गेली आहे.
याचा निर्णय राज्य सरकारे घेतील. याशिवाय सामाजिक, राजकीय, क्रीडा, धार्मिक कार्यक्रमांवर बंदी घालावी. शॉपिंग कॉम्प्लेक्स, चित्रपटगृह, रेस्टॉरंट, बार, क्रीडा संकुल, स्विमिंग पूल आणि धार्मिक स्थळं बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत, असं पॉल यांनी सांगितलं.