भारत-चीन तणावामुळे केंद्र सरकारने दोन महिन्यांपूर्वी चिनी अॅप वर बंदी घातली होती. केंद्र सरकारने भारतात पबजी या लोकप्रिय अॅपसह 118 चिनी अॅप बॅन केले होते. त्यापूर्वी केंद्र सरकारने टिक टॉक, शेअरइट, हॅलो, यूसी ब्राऊझर यांसारखे एकूण 59 अॅप्लिकेशन बॅन केले होते. दरम्यान, केंद्र सरकारने बंदी आणलेला पबजी मोबाईल गेम भारतात परतणार असल्याचे नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. सोबतच आता भारतात बॅन असलेलं टिकटॉक हे अॅपदेखील परतण्याची शक्यता आहे. टिकटॉकची मालकी असलेली कंपनी बाईटडान्सची सरकारसोबत बातचित सुरु आहे. कंपनीला टिकटॉक अॅप पुन्हा भारतात लाँच करायचं आहे. त्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरु केले आहेत.
टिकटॉक बॅन झाल्यानंतर बाईटडान्स कंपनीने त्यांच्या भारतातील एकाही कर्मचाऱ्याला नोकरीवरुन हटवले नव्हते. कंपनीचे भारतात 2000 हून अधिक कर्मचारी कंपनीकडे आहेत. सर्व लोकांच्या नोकऱ्या कायम असून कर्मचाऱ्यांना यंदा बोनसही दिला गेला आहे. टिकटॉकचे हेड निखिल गांधी यांनी कर्मचाऱ्यांना सांगितले होते की, आपली कंपनी लवकरच भारतात परतणार आहे. त्यासाठी आम्ही मेहनत घेत आहोत, तसेच सरकारशी बोलत आहोत. त्यामुळे टिकटॉक लवकरच भारतात सुरू होईल असा प्राथमिक अंदाज आहे. त्यामुळे टिकटॉक प्रेमिंमध्ये आनंदाचं वातावरण आहे.