रविवारी विदर्भातील एका मुलीचा सुरत येथील एका मुलासोबत होत असलेला बालविवाह रोखण्यात यश आलं आहे. बालविवाहाच्या विरोधात जनजागृती मोहीमेचं हे यश आहे. दैनिक लोकमंथनचे संपादत पुरुषोत्तम बोर्डे यांनी एका मुलीचा बालविवाह रविवारी होत असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांना कळवली.
या मुलीला विदर्भातून गुजरात मध्ये नेलं असल्याचं कळलं. त्या माहितीनुसार महिला व बालविकास अधिकाऱ्यांनी तातडीने कार्यवाहीला सुरूवात केली. अधिकाऱ्यांनी भरूच येथील पोलीसांना या बालविवाहाची माहिती दिली, आणि कसं ही करून हा बालविवाह रोखण्याची विनंती केली.
महिला व बालकल्याण विभागाचे अधिकारी सातत्याने भरूच पोलीसांच्या संपर्कात होते. वेळ कमी होता. एका मुलीचं बालपन वाचवण्यासाठी सर्व पोलीस आणि प्रशासकीय यंत्रणांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आणि अखेर हा बालविवाह रोखला गेला.
बालविवाह हा कायद्याने गुन्हा आहे. कोवळ्या मुला-मुलींचं आयुष्य बरबाद करू नका. त्यांना सक्षम होऊ द्या. लग्नाची घाई जीवघेणी ही ठरू शकते. बेकायदेशीर कृत्याला बळू पडू नका. मुलींना चांगलं शिक्षण द्या, त्यांना शारीरिक, मानसिक, आर्थिक दृष्ट्या सक्षम होऊ द्या. असं यशोमती ठाकूर यांनी म्हटलं आहे.
राज्यात लॉकडाऊनचा फ़ायदा घेत अनेक बालविवाह झाले. सजग नागरिक आणि अधिकाऱ्यांनी वेळीच लक्ष देऊन शेकडो बालविवाह थांबवले. ही एक चळवळ आहे. सर्वांनी प्रयत्न केले तरच बालविवाहाच्या अनिष्ठ चालीतून समाजाची सुटका होईल. सामाजिक दडपणामुळे गप्प बसू नका. आज एक बालविवाह रोखल्याचा मला आणि संपूर्ण विभागाला आनंद आहे. तुम्ही ही तुमची जबाबदारी पार पाडा. बालविवाहाची माहिती आम्हाला कळवा. असे आवाहन मंत्री यशोमती ठाकूर यांनी केले आहे.