लॉकडाउनच्या काळात उपाशी राहण्याची वेळ आलेल्या वेश्या व्यावसायातील महिलांसाठी राज्य सरकारने महत्वाचा निर्णय घेतला आहे. शासनाने घेतलेल्या या निर्णयानुसार वेश्या महिलांना ऑक्टोम्बर ते डिसेंबरपर्यंत दरमहा 5 हजार रुपये दिले जाणार आहेत. तसेच ज्या महिलांची मुले शाळेत जातात त्यांना अतिरिक्त 2,500 रुपये दिले जाणार आहेत. कोणत्याही प्रकारच्या ओळ्खपत्रांचा आग्रह न धरता त्यांना मदत केली जाणार आहे. त्याअंतर्गत ऑक्टोम्बर ते डिसेंबर, 2020 या 3 महिन्याच्या कालावधीसाठी 51 कोटी 18 लाख 97 हजार 500 रुपये इतका निधी मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून उपलब्ध करून देण्याबाबतचा शासन निर्णय आज जारी करण्यात आला आहे.
दरम्यान, या सर्व महिलांना कोरडे अन्नधान्य आणि रोख आर्थिक सहाय्य यांसारख्या सेवा पुरविण्याच्या अनुषंगाने जिल्हानिहाय प्रस्ताव महिला व बालविकास आयुक्त यांच्याकडे पाठवण्यात येणार आहे. आता राज्यातील 32 जिल्ह्यातील नॅशनल एड्स कंट्रोल ऑर्गनायझेशन (नॅको) या संस्थेकडून वेश्या व्यवसायात ओळख निश्चित केलेल्या महिलांना हि आर्थिक मदत दिली जाणार आहे. यामध्ये जिल्हा पुरवठा अधिकारी, जिल्हा समाजकल्याण अधिकारी, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाकडील एक प्रतिनिधी, महिला पोलीस अधिकारी आणि निमंत्रित सदस्य म्हणून स्वयंसेवी संघटनांचा प्रतिनिधी यांचा समावेश असेल.