आजपासून देशात लसीकरणाला सुरुवात होत आहे. सीरम इन्स्टिट्यूट पुणे आणि ऑक्सफर्ड विद्यापीठाने तयार केलेली ‘कोव्हिशील्ड’ आणि भारत बायोटेक कंपनीची ‘कोव्हॅक्सिन’ या दोन लस पहिल्या टप्प्यात दिल्या जाणार आहेत.
कोरोनाला आळा घालण्यासाठी आजपासून राष्ट्रीय पातळीवर लसीकरणाची मोहीम सुरु करण्यात आली आहे. मोहिमेचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन करण्यात आले. यावेळी मोदींनी देशवासीयांशी संवाद साधला. जनता कर्फ्युने देशातील नागरिकांची सहनशीलता आणि शिस्तीची परीक्षा घेतली. या परिक्षेत सर्व देशवासी यशस्वी झाले. सर्वांनी टाळ्या, थाळ्या वाजवल्या, दिवे लावले यामुळे देशाचा अत्मविश्वास वाढला, असे मोदीजी म्हणाले.
लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात 3 कोटी लोकांना लस देण्यात येणार आहे. दुसऱ्या टप्प्यात मोहीम 30 कोटी लोकांपर्यंत घेऊन जायची आहे. दुसऱ्या टप्प्यात वृद्ध नागरिकांना आणि गरज असलेल्या लोकांनाच लस दिली जाईल. भारताची लसीकरण मोहीम खूप मोठी असणार आहे, असं मोदी म्हणाले.