‘या’मुळे राष्ट्रवादी पक्षाची नाहक बदनामी झाली; अजित पवार म्हणतात…

48

धनंजय मुंडे यांच्यावर झालेल्या गंभीर आरोपामुळे त्यांचे मंत्रिपद धोक्यात आले होते. मात्र, आता त्यांना सदरील प्रकरणात मोठा दिलासा मिळाला आहे. कारण रेणू शर्मा या महिलेने आपली तक्रार मागे घेतली आहे. कौटुंबिक कारणास्तव आपण तक्रार मागे घेत असल्याचं रेणू शर्मा यांनी सांगितलं.

रेणू शर्मा यांच्या आरोपानुसार तक्रार दाखल झाली असती तर धनंजय मुंडे यांच्याविरोधात गंभीर गुन्ह्यांची नोंद झाली असती. मागील पंधरा दिवसांत मुंडे अरोपामुळे त्रस्त झाले होते. मात्र आता रेणू शर्मा या तरुणीने तक्रार मागे घेतल्याने त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्यावर अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवार संत तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग संदर्भात बैठकीसाठी पुण्यात आले असता पत्रकारांशी बोलत होते.

“एखादी राजकीय व्यक्तीला प्रचंड काम करावं लागतं, कष्ट घ्यावे लागतात. पण असं जेवढं घडतं तेव्हा त्याला त्याच्या पदावरुन एक क्षणात पायउतार व्हावं लागतं. याचा सगळ्यांनी गांभीर्याने विचार करायला पाहिजे. ज्यांनी ज्यांनी धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली, त्यांच्या विरुद्ध वक्तव्य केलं त्याला जबाबदार कोण?” असा सवाल अजित पवार यांनी विचारला.

“बहुजन समाजातून पुढे आलेला एक सहकारी, तो बदनाम होतो, त्याचं कुटुंब डिस्टर्ब होतं त्याला वाली कोण? आम्ही पाठीशी घालतोय असे आरोप झाले, आम्ही संपूर्ण तपास होऊ द्या सत्य बाहेर येऊ द्या म्हणत होतो पण धनंजय मुंडे आणि आमच्या पक्षाची बदनामी झाली”, असंही अजित पवार म्हणाले