गांधी भवन येथे नाना पटोले यांच्या उपस्थितीत आज धुळे ग्रामीणचे माजी आमदार प्रा. शरद पाटील यांनी काँग्रेस पक्षात घरवापसी केली. त्यांच्यासोबत माजी नगरसेवक, माजी जिल्हा परिषद सदस्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपा, शिवसेना पक्षातील शेकडो सदस्यांनीही काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
या पक्षप्रवेश कार्यक्रमाला प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, आदीवासी विकास मंत्री के. सी, पाडवी, कार्याध्यक्ष नसिम खान, ज्येष्ठ नेते माजी मंत्री रोहिदास पाटील, कार्याध्यक्ष आ. कुणाल पाटील, आदी उपस्थित होते.
यावेळी, पटोले पुढे म्हणाले की, काँग्रेस पक्षाला गतवैभव मिळवून देण्यासाठी सर्वांनी एकत्रपणे काम केले पाहिजे. उत्तर महाराष्ट्र हा काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला होता आता पुन्हा या भागातून लोकसभा, विधानसभेचे प्रतिनिधित्व वाढवून २०२४ मध्ये काँग्रेस स्वबळावर सत्तेत येईल यासाठी काम करा असे, आवाहन करून शरद पाटील यांच्यासह पक्षात प्रवेश केलेल्या सर्वांचे त्यांनी काँग्रेस परिवारात स्वागत केले.