उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यात काल हिमकडा कोसळून दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेमुळे मोठ्या प्रमाणावर जीवित आणि वित्तहानी झाली आहे. या जलप्रलयानंतर मृत्यूच्या दाढेत अडकलेल्या अनेक कर्मचाऱ्यांची सुटका करण्या आली आहे. पाण्याची पातळी वाढल्याने चामोलीपासून ते हरिद्वारपर्यंतची कित्येक घरे वाहून गेली आहेत. प्रशासन घटनास्थळी पोहोचले असून मदत व बचावकार्य सुरू होते.
दरम्यान, घडलेल्या या दुर्घटनेमुळं भारतीय क्रिकेट संघातील यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत कसोटी सामन्याचं मानधन पीडितांना मदत कार्यासाठी देणार आहे. त्याने ट्विट करून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. पंतने लिहिले ट्विटमध्ये लिहले की, ‘उत्तराखंडमधील जीवितहानीने फार दुःख झाले. मी बचाव कार्यासाठी माझी संपूर्ण मॅच फी देऊ इच्छितो आणि या दु:खाच्या क्षणी लोकांना मदतीसाठी पुढे येण्याचे आवाहन करतो.’
दरम्यान, रविवारी सकाळी १० ते ११ च्या सुमारास उत्तराखंडमधील चमोली येथे हिमकडा कोसळून महापूर आला होता. या दुर्घटनेमुळे ऋषिगंगा ऊर्जा प्रकल्प पूर्णपणे उद्ध्वस्त झाला होता. तर शेकडो कर्मचारी हे विविध ठिकाणी बोगद्यांमध्ये अडकले आहे. अनेकांची सुटका करण्यात यश मिळालं असलं तरी आतापर्यंत १४ जणांचा या दुर्घटनेत मृत्यू झाला आहे.