महाराष्ट्रातील प्रसिद्ध व्याख्याते आणि किसान युवाक्रांती संघटनेचे अध्यक्ष यशवंत गोसावी यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना खरमरीत पत्र लिहून जाब विचारला आहे. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र सरकारवर फडणीस यांनी बेछूट आरोप केले आहेत.
संकट काळात अशी अपेक्षा नाही. महाराष्ट्राला महान राजकीय परंपरा लाभली असल्याचं यशवंत गोसावी यांनी आपल्या खुल्या पत्रात म्हटलं आहे. घाणेरडे राजकारण करू नका असा मौलिक सल्लाही फडणवीसांना गोसावी यांनी दिलाय. यशवंत गोसावी यांचे खुले पत्र त्यांच्याच शब्दात जशास तसे…
आदरणीय देवेंद्रजी,
नागपूरच्या नगरसेवकापासून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदापर्यंतचा आपला प्रवास अतिशय अभिमानास्पद आहे आणि आज आपण तितक्याच महत्त्वाच्या विरोधी पक्षनेते पदावर आरूढ आहात पण कोरोनाच्या संकट काळात त्या पदाची आणि राज्याची इभ्रत जाईल अशी वागणूक आपण करू नये ही सर्वसामान्य मराठी माणसाची अपेक्षा आहे
आज कोरोनाने राज्यातील लाखो लोक त्रस्त असताना, त्यांना लस मिळावी-औषधें मिळावी याकरता प्रयत्न करण्याऐवजी आपण कोरोना लसीच्या नावाखाली जे घाणेरडे राजकारण करताय, ते आपल्यासारख्या माजी मुख्यमंत्र्यांला अजिबात शोभत नाही
केंद्रातील सरकार पाकिस्तान-बांग्लादेशला लस देऊ शकते, पण महाराष्ट्राला लस देण्यात दुजाभाव करतेय हे नागडे सत्य आहे
अशा वेळी स्वतःचे केंद्रातील वजन वापरून तुम्ही महाराष्ट्राला दिलासा द्यायला हवा होता.. पण आपण तर राजकारण करताय
जिनेव्हामध्ये भारताची भूमिका मांडण्यासाठी तत्कालीन पंतप्रधान नरसिंहराव यांनी विरोधी पक्षनेते अटलबिहारी वाजपेयी यांना पाठवले होते, तर अटलजींनी गुजरातमधल्या भूकंप पुनर्वसनाची जबाबदारी विरोधी पक्षातील शरद पवारांना सोपवली होती
संकटाच्या काळात पक्षभेद विसरून एकत्र येणे ही आपल्या राजकारणाची महान परंपरा आहे आणि त्याची तुम्हाला आठवण करून द्यावी लागतेय, हे दुर्दैवी आहे
देवेंद्रजी,राज्यातला शेतकरी प्रचंड अडचणीत आहे, त्याला कुठूनच दिलासा मिळत नाहीये आणि अशा वेळी त्या शेतकऱ्यांचे प्रश्न अधिवेशनात मांडण्याऐवजी आपण ‘अंबानीच्या बंगल्यासमोरील गाडी’ या विषयावर संपूर्ण अधिवेशन वाया घातले.
विजबिलांच्या संदर्भात आपण ठोस भूमिका घेतलीच नाही ,कारण मुंबई व परिसराला अंबानी-अदानीच्या कंपन्या वीजपुरवठा करतात.. त्यांना तुम्हाला दुखवायचे नव्हते .. हे खरे आहे का ?
“महाराष्ट्राच्या राजकारणाला एक नैतिक परंपरा आहे” असे नितीनजी गडकरी कायम म्हणतात ,आपण त्या परंपरेला बट्टा लावताय याची जाणीव करून देण्यासाठी हे पत्र लिहिलंय
नाहीतर “मी पुन्हा येईन” ही तुमची वलग्ना,
तुम्ही ‘पुन्हा कधीच येणार नाही’ अशीच ठरेल..!
यशवंत गोसावी
अध्यक्ष : किसान युवा क्रांती संघटना
टीप : सदरील पत्र मी महाराष्ट्राचा नागरिक या नात्याने लिहिलंय, त्यामुळे सर्वपक्षीय ‘सतरंजीछाप’ कार्यकर्त्यांनी इकडे फिरकू नये.