तुमच्याकडून फेक न्यूज पसरवण्याची अपेक्षा नाही, भाजपने लगावला संजय राऊत आणि जयंत पाटील यांना टोला !

15


मुंबई : राष्ट्रवादीचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात सीबीआय’ने गुन्हा नोंद केला आहे. तसेच सीबीआय’ने त्यांच्या मुंबई आणि नागपूर येथील घरी आणि कार्यालयावर छापे टाकण्यात आले होत. याच पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत आणि राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री जयंत पाटील यांनी भारतीय जनता पक्षावर आणि केंद्रातील मोदी सरकार टीका केली होती.


आता या टीकेला भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी एक ट्विट करून शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत व राष्ट्रवादी नेते आणि जलसंपदामंत्री जयंत पाटील यांना प्रत्युत्तर दिले आहे. केशव उपाध्ये यांनी मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशपत्रातील काही मजकूर फोटोच्या माध्यमातून या ट्विटसोबत शेअर केला असून, तुमच्याकडून फेक न्यूज पसरवण्याची अपेक्षा नाही, असा टोला संजय राऊत आणि जयंत पाटील यांना लगावला आहे.


मुंबई उच्च न्यायालयाने सीबीआयला कधीही अहवाल सादर करण्याचे निर्देश दिलेले नाहीत. या आरोपांमध्ये काही तथ्य आढळल्यास कायद्यानुसार पुढे जाण्याचे निर्देश सीबीआयला दिले आहेत, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिल्याचे केशव उपाध्ये यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. सोबत आदेशपत्राचा एक फोटोही शेअर केला आहे. त्यामुळे राऊत आणि पाटील करत असलेल्या आरोपांना केशव उपाध्ये यांनी सडेतोड उत्तर दिले आहे.


न्यायालयाकडून चौकशीच्या मिळालेल्या परवानगीचा उपयोग सीबीआय धाडसत्र घालून राजकीय उद्दिष्टे साध्य करताना दिसत आहे. अशा धाडींचा राजकीय नेत्याला बदनाम करण्यासाठीच वापर होत आहे. उच्च न्यायालयाने केवळ ‘प्राथमिक चौकशी’ करण्याचे आदेश दिलेले होते. या प्राथमिक चौकशीतून काय निष्पन्न झाले, याचा अहवाल कोर्टासमोर मांडण्यात आल्याचे अद्यापपर्यंत ऐकिवात नाही असे जयंत पाटील म्हणाले.