मरखेल: बातमीदार एस आय शेख
सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून एका ३० वर्षीय तरुण शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी (ता. २५) रोजी सकाळी सात वाजताच्या सुमारास दावणगीर (ता. देगलूर) येथे उघडकीस आली. तरुण शेतकऱ्याच्या या मृत्यूमुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.
प्राप्त माहितीनुसार, दावणगीर येथील मयत शेतकरी खुशाल उर्फ पिंटू मारोती देवकत्ते (वय : ३०) हा गावात शेती करीत होता. गेल्या काही वर्षांपासून सतत ओल्या व कोरड्या दुष्काळामुळे होणाऱ्या नापिकीला तो कंटाळला होता. त्यातच भारतीय स्टेट बँकेचे त्याच्यावर पीककर्ज होते. सदरचे कर्ज कसे फेडावे? या विवंचनेत होता.
तो (ता. २५) रोजी सकाळी स्वतःच्या शेतात पाणी देण्यासाठी म्हणून घरातून निघून गेला. व लिंबाच्या झाडास दोरीने गळफास घेतला. मयताचे वडील मारोती देवकत्ते हे जनावरे घेऊन शेताकडे गेले असता, हा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी मरखेल पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नागनाथ सुर्यतळ हे करीत आहेत.