पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा सोळावा दीक्षान्त समारंभ राज्यपाल तथा कुलपती भगत सिंह कोश्यारी यांच्या दूरस्थ उपस्थितीत आज संपन्न झाला. त्यावेळी त्यांनी युवकांना डोळ्यांपुढे मोठे लक्ष्य ठेवावे असा मोलाचा सल्ला दिला.
राज्यपालांनी ‘सदाचार हा थोर सांडूं नये तो, जनीं तोचि तो मानवी धन्य होतो’ हे समर्थ रामदास यांचे वचन उद्धृत केले. ते म्हणाले समाजात कित्येकदा मोठमोठ्या लोकांचे नैतिक अध:पतन झालेले दिसते, त्यामुळे युवकांनी सद्गुणी व सदाचारी लोकांची संगत ठेवल्यास जीवन सफल होईल.
पदवी प्राप्त करणे ही जीवन शिक्षणाची केवळ सुरुवात आहे.निवडलेल्या क्षेत्रात नवसृजन करावे व ध्येयसिद्धीसाठी कठोर परिश्रम करावे. देशासाठी परिश्रम केले तर त्यात आपले हित आपसूकच साधले जाईल. युवकांनी परिश्रमांना सदाचाराची जोड दिल्यास सशक्त, समर्थ व आत्मनिर्भर भारत निर्माण करता येईल, असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले.
सुवर्ण पदक तसेच पीएचडी प्राप्त स्नातकांचे अभिनंदन करताना युवकांनी मुद्रा, स्टार्ट अप इंडिया, प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना आदी योजनांचा लाभ घेऊन आत्मनिर्भर व्हावे, अशी सूचना राज्यपालांनी आपल्या भाषणात केली.
यावेळी माजी मंत्री, आमदार सुभाष देशमुख, विद्यापीठाच्या कुलगुरू मृणालिनी फडणवीस, विद्यापीठाच्या विविध प्राधिकरणांचे सदस्य व विद्यार्थी उपस्थित होते.