महाराष्ट्रातील दिग्गज नेते जेंव्हा दुबईचे व्यापारी इक्बाल शेख व्हावं लागलं त्याची रंजक कहाणी शेयर केली आहे महाराष्ट्राच्या महायुती सरकार मधील एक महत्वाचे नेते आणि मंत्री
त्या काळातील संघर्षाची केली आठवण शेयर केली आठवण
कर्नाटक सीमाभागातील मराठी बांधवांवरील अन्यायाविरोधात आणि मराठी अस्मितेच्या रक्षणासाठी बेळगावच्या भूमीत घुमलेल्या ऐतिहासिक लढ्याला आज ४० वर्षे पूर्ण होत आहेत. कर्नाटकाच्या सीमावर्ती भागात मराठी माणसांवर होत असलेल्या सरकारी अन्यायाविरोधात निर्भयपणे उभे राहून मराठी जनतेच्या हक्कांसाठी दिलेला तो लढा आजही तितकाच प्रेरणादायी आणि स्मरणीय आहे.
१९५६ च्या राज्य पुनर्रचनेनंतर बेळगाव, कारवार, निपाणी, खानापूर, बिदर, भालकी यांसारखे मराठी भाषकबहुल भाग कर्नाटकात समाविष्ट करण्यात आले. तेव्हापासून सीमाप्रश्न हा महाराष्ट्राच्या मनातील वेदना आणि मराठी जनतेच्या न्यायाच्या लढ्याचे प्रतीक बनला. दुर्दैवाने, अनेक दशकांनंतरही या प्रश्नाची अद्याप सुटका झालेली नाही, याची खंत आहे.
जून १९८६ मध्ये सीमाभागातील मराठी बांधवांवर कन्नड भाषेची सक्ती लादण्याचा प्रयत्न झाला. मराठी भाषकांचा आवाज दाबण्याच्या या प्रयत्नाविरोधात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली आक्रमक आंदोलनाची हाक देण्यात आली. कर्नाटक सरकारने महाराष्ट्रातून बेळगावात जाणारे सर्व मार्ग बंद केले होते. मात्र, मराठी स्वाभिमानासाठी कोणतीही अडचण आडवी येऊ नये, या निर्धाराने गनिमी काव्याची रणनीती आखण्यात आली.
मी स्वतःची ओळख लपवण्यासाठी मिशी काढून, शर्ट-पॅन्ट, गळ्यात टाय, खोटी दाढी आणि हातात सिगार घेऊन दुबईचे व्यापारी ‘इक्बाल शेख’ यांचा वेश धारण करून कर्नाटकात कूच केली. ही वेशभूषा इतकी अचूक होती की अनेक जवळच्या व्यक्तींनीही मला ओळखले नाही. मुंबईहून गोवा मार्गे बेळगावकडे जाताना पोलिसांचा ससेमिरा चुकवत अखेर बेळगावात प्रवेश करण्यात यश आले. ४ जून १९८६ च्या रात्री बेळगावात पोहोचून, दुसऱ्या दिवशी शेकडो शिवसैनिकांसह कर्नाटक सरकारच्या दडपशाहीविरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात आले. या अनपेक्षित आणि धाडसी कृतीने कर्नाटक प्रशासन हादरून गेले. त्यानंतर धारवाड जिल्हा कारागृहात तब्बल १६ दिवस शासकीय कोठडी भोगावी लागली. या संघर्षात दगडू सकपाळ, बाबा पिंगळे, अरविंद तायडे, हेमंत मंडलिक आणि असंख्य निष्ठावंत शिवसैनिकांनी खांद्याला खांदा लावून साथ दिली.
आज चार दशकांनंतर त्या संघर्षाच्या आठवणी पुन्हा जाग्या होत आहेत. सीमाभागातील मराठी बांधवांच्या न्याय्य हक्कांसाठी उभा राहिलेला तो लढा केवळ एका आंदोलनाची कथा नव्हती, तर मराठी अस्मिता, स्वाभिमान आणि न्यायासाठी दिलेल्या संघर्षाचे प्रतीक होता. मराठी माणसाच्या हक्कांचा हा आवाज आजही तितक्याच ताकदीने घुमत आहे आणि पुढेही घुमत राहील

